तुम्हीच सांगा..अजून किती दिवस फेर्‍या मारायच्या

कोव्हिड लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा; नागरिकांची मागणी
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरात एकमेव असलेल्या कोव्हिड लसीकरण केंद्रावरती मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे तसेच श्रीवर्धन शहराची लोकसंख्यादेखील जास्त असल्यामुळे या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

ज्या नागरिकांनी परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढलेले आहेत असे नागरिक आपल्याला परदेशात जायचे आहे असे सांगून पासपोर्ट घेऊन लसीकरण केंद्रावरती येत असल्याने पासपोर्ट असणार्‍यांसाठी वेगळी रांग तयार करण्यात येते. तर, या ठिकाणी एक स्वयंघोषित स्वयंसेवक अनेकांना रांगेतून बाहेर काढून लसीकरणासाठी पुढे घेऊन जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. लसीकरण केंद्रावर रांगा लावण्यामध्ये सावळागोंधळ होत असेल तर प्रशासनाने त्या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड नेमावा, अशी मागणी होत आहे.

ज्या नागरिकांकडे पासपोर्ट आहे व त्यांना परदेशात जायचे आहे, तर त्यांचा व्हिसा व तिकीट पाहिल्यानंतरच त्यांना तातडीने लसीकरण करण्यात यावे. अन्यथा आपल्याकडे पासपोर्ट आहे म्हणून त्याचा फायदा घेत लसीकरण अगोदर करून घेण्याची घाई करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर अशाप्रकारे सावळागोंधळ होत असूनसुद्धा श्रीवर्धन शहरातील एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आवाज उठवताना दिसून येत नाही.

श्रीवर्धन शहरामध्ये व तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेकजण लसीकरण करण्यासाठी घाई करत आहेत. परंतु, एक दिवस त्या ठिकाणी असणार्‍या स्वयंघोषित स्वयंसेवकामुळे नागरिकांचा उद्रेक होऊन हाणामारीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण रायगड जिल्ह्यात लसीकरण योग्य प्रकारे होत असतानाच पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात अशी अवस्था का? त्यांनी श्रीवर्धनमध्ये सुरु असलेल्या या प्रकाराची माहिती घेऊन प्रशासनाला योग्य सूचना देण्याची आवश्यकता आहे. तरी प्रशासनाने या सावळ्या गोंधळाची परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी योग्यरीतीने लसीकरण होईल यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version