रस्त्यावर उभ्या मालवाहू वाहनांमुळे कोंडी

प्रवासी, पादचारी व वाहनांची गैरसोय

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील नाणोसे गावाजवळ असलेल्या एका आटा कंपनीच्या वाहनांमुळे येथील रहदारीच्या रस्त्यावर कोंडी होत आहे. यामुळे प्रवासी पादचारी व वाहनांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकतेच कंपनीला निवेदन देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या निवेदनात नमूद केले आहे की, सुधागड तालुक्यातील नाणोसे गावालगत श्रीहरी आटा कंपनीमुळे स्थानिकांना त्रास होत आहे. येथे रस्त्यालगत लावलेल्या ट्रकमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रोज पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्याची साईडपट्टीदेखील शिल्लक राहात नाही. शालेय विद्यार्थ्यांना बसस्थानकात उभे असताना पार्क केलेल्या या वाहनांमुळे बस दिसत नसल्यामुळे स्थानकाच्या बाहेर उन्हात, तर पावसाळ्यात पावसात उभ राहून बसची वाट बघावी लागते. कारण, बस दिसली नाही आणि बस नाही थांबली तर 2 ते 3 किलोमीटर शाळेत पायी चालत जावे लागते. याशिवाय कंपनीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत वारंवार तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधागड तालुका अध्यक्षा हर्षदा शिंदे यांच्याकडे येत होत्या. यासंदर्भात हर्षदा शिंदे व पदाधिकारी यांच्यातर्फे कंपनीचे शिफ्ट इन्चार्ग अमित यादव यांना जाब विचारण्यात आला. जर वाहने पुन्हा चुकीच्या पद्धतीने लावणे किंवा त्यामुळे होणारी कोंडी थांबली नाही, तर मनसे स्टाईल ने उत्तर देण्यात येईल, असं ठणकावून सांगितले. यावेळी मनसे रायगड जिल्हा अध्यक्षा सपना राऊत, जिल्हा सचिव आकांक्षा शर्मा, सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, तालुका महिला अध्यक्षा हर्षदा शिंदे, तालुका उपाध्यक्ष केवल चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महिन्याभरात उपाययोजना
या संदर्भात कंपनीचे शिफ्ट इन्चार्ग अमित यादव यांनी सांगितले की, पुढील एक महिन्यात येथील वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करून रस्ता पूर्णपणे मोकळा केला जाईल.
Exit mobile version