पाच मिनिटांच्या प्रवासाला दीड तास; विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांचा रोजचा मनस्ताप
| अलिबाग | प्रतिनिधी |
अवघ्या पाच मिनिटांत पार होणाऱ्या कुरुळ ते बेलकडे प्रवासासाठी वाहनचालकांना तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. रस्त्याचे संथ काम, ठेकेदाराचे ढिसाळ नियोजन आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा संयम सुटू लागला आहे. विकासकामाच्या नावाखाली नागरिकांना रोजच्या प्रवासाची शिक्षा का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अलिबाग तालुक्यातील या मार्गावर सकाळी शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी बाहेर पडणारे चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी आवश्यक नियोजन केलेले दिसत नाही. ठेकेदाराचे मोठे ट्रक, मिक्सर आणि अन्य अवजड वाहने रस्त्यावरच उभी राहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यात धूळ, अपुरे मनुष्यबळ आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
सुट्टीच्या दिवसांत आक्षी, नागाव आणि मुरुडकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. काही वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने घुसवत असल्याने समोरासमोर वाहने अडकून वाहतूक ठप्प होत आहे. वाहतूक पोलिसांची यंत्रणाही या परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. रस्त्याचे काम आणखी महिनाभर सुरू राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. रोजच एक ते दीड तास कोंडीत घालवायचा का? असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत.
ठेकेदाराने अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री लावून कामाला वेग द्यावा, अवजड वाहने रस्त्याबाहेर उभी करावीत आणि कामाच्या ठिकाणी स्वतंत्र वाहतूक कर्मचारी नेमावेत, अशी मागणी होत आहे. गर्दीच्या वेळेत एकेरी वाहतुकीचे नियोजन करावे तसेच धूळ रोखण्यासाठी नियमित पाणी मारावे, अशीही अपेक्षा आहे. रस्त्याचे काम विकासासाठी असले तरी त्याचा त्रास नागरिकांच्या माथी मारता येणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने उपाययोजना करून वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पर्यायी मार्ग नाही, मग कामाचे नियोजन कसे?
कुरुळ ते बेलकडे मार्गावर रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी वाहतूक मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, पर्यायी मार्ग नसतानाही काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासासाठी दीड तास लागत असेल, तर कामाचे नियोजन नेमके कोणी केले? नागरिकांच्या गैरसोयीचा विचार न करता काम सुरू करण्याची घाई का करण्यात आली? असे सवाल उपस्थित होत आहेत.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे
या मार्गावर प्रवास करताना विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांचे हाल होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे. संबंधित विभाग, ठेकेदार आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक घेऊन वाहतुकीचे नियोजन करावे. कामाला वेग देतानाच नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होईल, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना बंदी घाला!
कुरुळ ते बेलकडे मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे आधीच वाहतूक कोंडी होत असताना मोठे ट्रक, मिक्सर आणि अन्य अवजड वाहनांची भर पडत आहे. त्यामुळे सकाळी शाळा-महाविद्यालये आणि कामावर जाण्याच्या वेळेत तसेच सायंकाळी घरी परतण्याच्या वेळी या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालावी. संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.






