रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार

राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना राजकीय मुद्याचे स्वरूप देत सत्ताधारी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या भवित्यावर परिणाम करणाऱ्या पेपरफुटीच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रोहा तालुकाध्यक्ष मितेश कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा येथे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला जाब विचारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षानुवर्षे सुरू असतानाही नागरिकांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. उलट खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्ते सुविधांमुळे वाहनचालक, व्यापारी, विद्यार्थी तसेच दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष परिस्थितीत बदल किती झाला, असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करण्यात आला. जनतेच्या या प्रश्नांना केवळ निवेदनापुरते मर्यादित न ठेवता गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित पेपरफुटीच्या घटनांवरही बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. वर्षभर अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांमुळे पाणी फेरले जात असेल, तर ही गंभीर बाब आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच महागाई, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे ही नाराजी संघटित करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

आगामी काळात गावागावांत जनसंपर्क वाढवून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात येणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले. यादरम्यान, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी रोहा तालुक्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. समाजसेवा आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या बैठका घेण्यापेक्षा जनतेच्या प्रत्यक्ष प्रश्नांमध्ये उतरून त्यांना न्याय मिळवून देणे हीच काँग्रेस कार्यकर्त्यांची खरी जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, तालुकाध्यक्ष मितेश कल्याणी, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विलास सुर्वे, उपाध्यक्ष अशपाक पानसरे, सरचिटणीस सुनील देशमुख, खजिनदार रामप्रकाश कुशवाह, अल्पसंख्याक अध्यक्ष बिलाल कुरेशी, तालुका कार्यकारी अध्यक्ष फैजल अधिकारी, आदिल पानसरे, विनोद सावंत, अशोक कांबळे, बशीर भुरे, हरिओम टाळकुटे यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version