काँग्रेस आमदार मंत्र्यांवर नाराज; दिल्लीत हायकमांडची भेट घेणार?

नागपूर | प्रतिनिधी |
राज्यातील काँग्रेसचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असल्याचं वृत्त आहे. या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी नाराज आमदार थेट दिल्लीला हायकमांडची भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यात काँग्रेसच्याच काही मंत्र्यांवर काँग्रेस आमदारांची वाढती नाराजी वाढली आहे. जवळपास सात ते आठ आमदार मंत्र्यांवर नाराज असून हे आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत हायकमांडची भेट घेऊन खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांची तक्रार करणार आहेत,
पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत. यावेळी ते काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेनुगोपाल यांची भेट घेणार आहेत. या नाराज आमदारांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भेटीचीही वेळ मागितली आहे. 10 दिवसांपूर्वी विदर्भातल्या नाराज काँग्रेस आमदाराने दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची तक्रार केली होती. आता राज्यातील सात- आठ आमदार सामूहिक तक्रार करणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाना पटोलेंना डावलून जाणार?
दरम्यान, या नाराज आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे तक्रार करण्याऐवजी थेट दिल्लीत हायकमांडला भेटण्याचं ठरवल्याने आश्‍चर्य व्यक्त केलं जात आहे. पटोले यांच्याकडून नाराजी दूर होण्याची शक्यता नसल्याने हे आमदार दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर, काँग्रेसकडून या नाराजी नाट्यावर अजून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ज्या मंत्र्यांवर काँग्रेसचे आमदार नाराज आहेत त्यांची नावे मात्र गुलदस्त्यात आहेत. खासकरून पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्यातील हे मंत्री असल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याला अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.

Exit mobile version