काँग्रेसने पाळला राष्ट्रीय बेरोजगार दिवस

। उरण । वार्ताहर ।
शुक्रवार (दि.17) लाखो युवकांना बेरोजगार करणार्‍या केंद्र सरकारला जाब विचारण्याचा दिवस म्हणून काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून सर्वत्र पाळला जात आहे. या निमित्ताने उरण तालुक्यातील सर्व तरुण व महिला कामगारांनी केंद्र शासनाच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत विविध घोषणा देत राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला. हा निषेध मोर्चा कामगार नेते इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हिंद टर्मिनल्स कंपनी, भेंडखळ येथे काढण्यात आला. या मोर्चासाठी उपस्थित उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक लंकेश हिरामन ठाकुर, सरचिटणीस उरण तालुका इंटक प्रांजल दशरथ भोईर, सचिव उरण तालका युवक इंटक रविंद्र पाटील, उपाध्यक्ष उरण तालुका युवक अनिल ठाकुर , सरचिटनिस रायगड जिल्हा युवक इंटक अजित ठाकुर, उपाध्यक्ष मनसे उरण तालुका राकेश भोईर, संदीप वर्तक, संदेश भोईर, नितेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. आज तरुणांना नोकर्‍या नाहीत, रोजगार उपलब्ध नाहीत. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगाराबाबत दिलेला शब्द पाळला नाही. रोजगार देणे दूरच उलट मा.नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून तरुणांच्या अनेक नोकर्‍या गेल्या आहेत. आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी घेतलेल्या कामगार विरोधी, रोजगार विरोधी धोरणाचा निषेध करत सदर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळण्यात आल्याचे इटंकचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर यांनी सांगितले.

Exit mobile version