नोकरीत डावलल्याने बेमुदत आंदोलन
दोनशेहून अधिक बेरोजगार उपोषणस्थळी
उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील केंद्र शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या ओएनजीसी कंपनीत स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरीत वेळोवेळी डावलले जात असल्याने नागाव- म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने सोमवार, दि. 9 ऑगस्ट या क्रांती दिनापासून ओएनजीसी उरण प्लांटच्या-पी.यू. गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून, दुसर्या दिवशी मंगळवारी ते सुरु आहे.
नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरीत डावलून नागाव-म्हातवली हद्दीबाहेरील लोकांना नोकर्या देण्यात येतात. त्याचा निषेध करण्यासाठी व स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी सर्व बेरोजगार प्रकल्पग्रस्त एकवटले असून, त्यांनी कायदेशीर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उरण पंचायत समितीचे सभापती अॅड. सागर कडू, शेकाप उरण तालुका चिटणीस यशवंत ठाकूर, शेकाप ज्येष्ठ नेते काका पाटील, शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. प्रदीप पाटील, पत्रकार प्रवीण पुरो आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसेंदिवस या उपोषणाला विविध राजकीय पक्ष व विविध सामाजिक संस्थाचा पाठिंबा वाढत आहे.
बेमुदत उपोषण करण्यासाठी नागाव-म्हातवली संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू, चिटणीस जितेंद्र ठाकूर, खजिनदार एस.के. पुरो, सदस्य घनश्याम ठाकूर, जनार्दन थळी, विलास पाटील, अलंकार घरत यांच्यासह 200 बेरोजगार युवक-युवती उपोषण स्थळी हजर होते.