उरणमध्ये काँग्रेसचा शांततापूर्व सत्याग्रह

। उरण । वार्ताहर ।
केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी उरण काँग्रेस समितीच्यावतीने मंगळवारी गांधी चौकात शांततापूर्व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. केंद्रातील सत्ता मोदी सरकारच्या हातात गेल्यापासून महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल डिझेल, सीएनजी, गॅस सिलिंडरच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावण्यात आल्याने मध्यमवर्गीय कराच्या ओझ्याखाली भरडला जात आहे. सरकारविरोधात आवाज उठवल्यास ईडीची चौकशी लावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केला. केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी करून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ उरणमध्ये शांततामय मार्गाने एकत्र येत सत्याग्रहाचे आयोजन करण्यात होते. जोपर्यंत ईडी सोनिया गांधी यांना निर्दोष मुक्त करीत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी यावेळी नमूद केले. उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Exit mobile version