| मुंबई | प्रतिनिधी |
काही दिवसांपूर्वी सातारा फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहून गळफास घेत जीवन संपवले होते. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून, आता हे प्रकरण राजकीय वळत घेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुंबईत फलटणमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणी तपासावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट वर्षा बंगल्यावर आंदोलन सुरू केले असून वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तसेच, या ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तथापि काँग्रेसच्या आंदोलनानंतर वर्षा बंगल्याच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.







