इंटक व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन पूर्ण
| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (शुक्रवार, दि. 6 जानेवारी) इंटकचे अधिवेशन व पनवेल शहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. या धर्तीवर पनवेलमध्ये नियोजन पूर्ण करण्यात आले असून, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व प्रताप गावंड यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे हेलिपॅडची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.
शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता नानभाऊ पटोले यांचे कळंबोली महामार्ग येथे आगमन व स्वागत होणार आहे. त्यानंतर कळंबोली सर्कल येथून पनवेलच्या दिशेने बाईक रॅली काढण्यात येईल. पनवेल येथे पोहोचल्यावर सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर ठीक 11 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महाराष्ट्र इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर नानाभाऊ पटोले हे उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
याप्रसंगी इंटकचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड, इंटकचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल काँग्रेस निरीक्षक माजी आमदार हुस्नबानू खलिफे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, मुंबई अध्यक्ष दिवाकर दळवी, इंटक नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील यांच्यासह इंटक व काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कामगार संघटनांचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास पनवेल, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील व मेळाव्याचे स्वागत समिती संयोजक वैभव पाटील यांनी केले आहे.