बरिकेट्स पाडून जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसखोरी

खा. राहुल गांधीच्या समर्थनार्थ रायगड काँग्रेस आक्रमक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्तवसूली संचालनालय (ईडी) कार्यालयाकडून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीची नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. तसेच खा. राहुल गांधी यांची सलग 3/4 दिवसा चौकशी करून त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्हा काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग काँग्रेस भवन येथून मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला.

यावेळी आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिराकोट येथे लावलेल्या बरिकेट्स पाडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. त्यावेळी तिथे असलेल्या चार महिला पोलिस कर्मचार्‍यांनी प्रवेशद्वार लावून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या संख्येने असलेल्या आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरील पोलिस कर्मचार्‍यांना न जुमानता ढकलून देत थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. आवारात केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या प्रसंगी मोदी जब जब डरता है, ईडी को आगे करता है, पहले लढे थे गोरोसे, अब लढेंगे चोरोसे, यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला होता. या मोर्चात जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, युवक जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. प्रथमेश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नंदा म्हात्रे, अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, हर्षल पाटील, भास्कर चव्हाण, राजेंद्र ठाकूर, सरोज डाकी, मोनिका पाटील, मुझफ्फर चौधरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरल्याचे समजताच अलिबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी महेंद्र घरत यांनी आवाराबाहेर पडून निदर्शने करण्याची विनंती केली. सुरुवातीला नकार देणार्‍या काँगेस कार्यकर्त्यांनी शेवटी आवाराबाहेर जावून प्रवेशद्वारावर निदर्शने केली. यावेळी महेंद्र घरत यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार टीका केली.

Exit mobile version