| तळा | प्रतिनिधी |
दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम राबविण्यात आली. दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करत असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातील तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. म्हणूनच दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यकडून महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवली जाते. यावेळी तळा शहरातील दुर्ग तळगडावर दुर्गरत्न प्रतिष्ठान तळा विभागाने संवर्धनाचे काम हाती घेतले होते. सलग तीन मोहीम घेतल्यानंतर पूर्णपणे मातीमध्ये गाडल्या गेलेल्या पाण्याच्या टाकीला दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी आणि रणरागिनींनी मोकळा श्वास मिळवून दिला. या पाण्याच्या टाकीमध्ये अनेक मोठ मोठे दगड व मोठ्या प्रमाणावर माती साचली होती; ती पूर्ण माती व दगड सलग तीन मोहीम घेऊन आपली तहानभूक विसरून, उन्हाचा मारा सहन करून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मेहनत घेऊन मोकळी केली. यामुळे दुर्ग तळगडावरील या टाकीला मोकळा श्वास मिळाला. याप्रसंगी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व जवळपास 70 सदस्य मोहिमेत सहभागी झाले होते.
ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम
