चौल-पाझर डोंगरावर वृक्षलागवड
| चौल | प्रतिनिधी |
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. परंतु, नुसते वृक्षारोपण करुन थांबू नका, तर लावलेल्या रोपट्यांचे संवर्धन करुन बहारदार वृक्षात रुपांतर करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषक कल्याणकारी संस्था, चौलचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले.
अलिबाग तालुका पातळीवर सामाजिक व कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कृषक कल्याणकारी संस्था, चौल, ज्येष्ठ नागरिक संघ रेवदंडा व निसर्गप्रेमी संस्था, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी कृषी दिनाचे औचित्य साधून चौल पाझर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात पाटील बोलत होते. संस्थेमार्फत दरवर्षी कृषी दिनानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. यंदाही स्थानिक वृक्ष करंज, चिंच, खैर, जांभुळ, काजू, आपटा आदी झाडांची यावेळी लागवड करण्यात आली. ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी कृषक कल्याणकारी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र गजानन पाटील यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहू नये. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कर्तव्य भावनेतून वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. आणि, तरच ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या धोक्याला आपण रोखू शकतो. पृथ्वीच्या भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. यामुळे भविष्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व विशदही त्यांनी केले. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनेच महत्त्व कळले. परंतु, तो निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन करणे, काळाची गरज असल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी, निसर्गप्रेमी संस्थेचे सदस्य तसेच कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सुधाकर राऊळ, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी छायाचित्रकार सुरेश खडपे, सुशील वर्तक, सिद्धराज पाटील, राजेश थळकर, राकेश काठे, सुशांत शिवलकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रकाश् पाटील यांनी केले.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. परंतु, वृक्षलावड ही नुसती दिखाव्यासाठी नको. तर, लावलेले प्रत्येक रोपटे जगवणे ही आपली जबाबदारी आहे. घरातील लहान बाळाची जशी आपण काळजी घेतो, जोपासतो, त्याप्रमाणे लावलेल्या रोपट्याची काळजी घेऊन ते योग्यरितीने वाढविण्यासाठी संगोपन करणे गरजेचे आहे. तरच, उजाड डोंगर हिरवेगार होतील. पर्यावरणाचा समतोल राखता येईल.
रवींद्र पाटील,
संस्थापक-अध्यक्ष, कृषक कल्याणकारी संस्था