। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील ऐतिहासिक शिवकालीन असलेल्या दुर्ग सुरगडावर रविवार (दि. 20) स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची अखंड गडसंवर्धन 34 वी मोहीम यशस्वी संपन्न झाली. या मोहिमेमधे सुरगडाच्या शिलेदारांनी एका ऐतिहासिक शिवकालीन तोफेच्या संवर्धनाचे कार्य या मोहिमेतून केले. गडावरील ही तोफ काही समाजकंटकांनी गडावरून खाली ढकळली असावी. तसेच वातावरणातील बदलामुळे आणि मुसळधार पडणार्या पावसामुळे ही तोफ काळाच्या ओघात नाहीशी होण्याआधी तीला योग्य स्थान देणं महत्वाचे होते. याच हेतूने गडाच्या घेर्यात अस्थाव्यस्थ पडलेल्या या तोफेला पुनः उभारी देत गडदैवता अन्साई देवीच्या प्रांगणात वीराजमान करायचे, असा संकल्प दसरा शस्त्रपुजनाच्या मोहिमेमध्ये करण्यात आला. आणि हा संकल्प सुरगडाच्या शिलेदारांनी या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण करत या तोफेचे सुरक्षित संवर्धन करण्यास यश मिळवले.
मागील दोन वर्षापासून येथील स्थानिक सुरगड संस्थेचे शिलेदार या गडाचे संवर्धन आणि संरक्षण करत स्वच्छ्ता तसेच पारिसरात विविध उपक्रम राबवत त्याची जनजागृती करतात. त्याचबरोबर नवरात्रौत्सव काळात गडपूजन आणि शस्त्रपूजन करून तोरण बांधले जातात. तसेच दिवाळी पहाटला गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करतात. तर गड संवर्धन करण्यासाठी येथील शिलेदार तन-मन-धन तसेच आपली शिदोरी घेऊन आठवड्यातील एक रविवार गडसंवर्धन कार्यासाठी देत असतात.
यावेळी तोफ संवर्धन कार्यात किशोर सावरकर, ललित जाधव, मंदार पार्टे, निलेश जाधव, साहिल जाधव, रोशन जाधव, अजित कदम, गणेश मांडे, पंकज सावरकर, पार्थ सावरकर, सिद्धेश शेलार, मनिष धामणसे, प्रथमेश चोरगे, श्रीयोग देशमुख, ललित पवार, विराज तेलंगे, रोहित सानप, अथर्व कापसे, श्रुतिक महाबळे, सुयोग लोखंडे, महेंद्र पार्टे (गडपाल) आदींनी अथक परिश्रम घेत हि मोहीम यशस्वी करून या तोफेचे संवर्धन केले.
बरीच वर्ष ही तोफ गडाच्या घेर्यात अस्थाव्यस्थ पडून होती. काळाच्या ओघात ती अधिक मातीत गाडली जाऊ नये, त्याचबरोबर तिची वातावरणातील बदलाने झीज होऊ नये यासाठी तिला योग्य स्थानी स्थानपन्न करणे गरजेचे होते. हि तोफ गडावर चढवणे अशक्य असल्याने या तोफेला काही अंतरावर असलेल्या गडाची देवता अन्साई देवी मंदिराच्या प्रांगणात विराजमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी केला. हा संकल्प आई अन्साई मातेने शिलेदारांना बळ देऊन सफल केला.
– किशोर सावरकर, सुरगडाचे शिलेदार