पुरातत्त्व विभागाकडून संवर्धनाचे काम हाती
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या उत्तर प्रवेशद्वारावरील ऐतिहासिक ‘वन बुरुज’ला अखेर नवसंजीवनी मिळत आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या ऐतिहासिक वास्तूच्या शास्त्रोक्त संवर्धनाचे काम हाती घेतले असून, जीर्णावस्थेत पोहोचलेल्या बुरुजाचे दगडी बांधकाम, तटबंदी आणि कोरीव स्थापत्य घटकांचे जतन अत्यंत काळजीपूर्वक केले जात आहे. या उपक्रमामुळे रेवदंड्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या आगरकोट किल्ल्याचा हा भव्य प्रवेशद्वार अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र, समुद्रकिनारी असलेल्या या वास्तूवर वर्षानुवर्षे पाऊस, खाऱ्या वाऱ्याचा परिणाम, नैसर्गिक झीज आणि झाडांच्या वाढीमुळे मोठा परिणाम झाला. प्रवेशद्वारावरील दगडी कमान, पोर्तुगीज सत्तेचे प्रतीक असलेले क्राऊन शिल्प, कोरीव नक्षीकाम तसेच तटबंदीचा काही भाग जीर्णावस्थेत पोहोचल्याने या वास्तूच्या तातडीच्या संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली होती.
रेवदंडा संरक्षण सहाय्यक बजरंग येळीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या मुंबई मंडळाने या कामाला मंजुरी दिली. अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी संवर्धन तज्ज्ञांकडून हे काम शास्त्रोक्त पद्धतीने केले जात आहे.
सध्या बांबूच्या माचांच्या साहाय्याने बुरुजाच्या प्रत्येक भागाची तपासणी करून सैल झालेल्या दगडांना पारंपरिक चुन्याच्या मिश्रणाने मजबुती दिली जात आहे. तसेच मूळ स्थापत्यशैलीला धक्का न लावता दगडी कमानी, शिलालेख, कोरीव शिल्पकला आणि तटबंदीचे संवर्धन करण्यात येत आहे. पुरातत्त्वीय निकषांचे काटेकोर पालन करून हे काम सुरू असल्याने वास्तूचे मूळ ऐतिहासिक स्वरूप अबाधित राहणार आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, किल्ल्यांचे प्रवेशद्वार हे केवळ दगडी बांधकाम नसून तत्कालीन लष्करी रणनीती, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहेत. त्यामुळे अशा वारशाचे जतन करणे ही काळाची गरज असून, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचा हा उपक्रम इतिहास संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवदंडा आगरकोट किल्ल्याचा ‘वन बुरुज’ पुन्हा एकदा इतिहासप्रेमी, पर्यटक आणि संशोधकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, रेवदंड्याच्या ऐतिहासिक ओळखीला नवसंजीवनी मिळणार आहे.
रेवदंडा आगरकोट किल्ल्यावरील ‘वन बुरुज’चे संवर्धन पुरातत्त्वीय निकषांनुसार करण्यात येत आहे. मूळ दगडी बांधकाम, शिल्पकला आणि स्थापत्य वैशिष्ट्ये कायम ठेवत पारंपरिक साहित्याचा वापर केला जात आहे. या संवर्धनामुळे ही ऐतिहासिक वास्तू पुढील अनेक वर्षे सुरक्षित राहील आणि भावी पिढ्यांनाही हा वारसा अनुभवता येईल.
– डॉ. अभिजित आंबेकर, अधीक्षक,
केंद्रीय पुरातत्त्व विभाग, मुंबई मंडळ
