मोडेन पण वाकणार नाही…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कारवाई नाही; सरकारची हायकोर्टात ग्वाही
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता 17 सप्टेंबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तसेच तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत सरकारमधील कोणाविषयी बदनामीकारक वक्तव्य करणार नाही, ही हमी देण्यास राणे यांनी उच्च न्यायालयातही नकार दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या वक्तव्याशी संबंधित सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपल्यावर पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश देण्याची नारायण राणे यांची उच्च न्यायालयात मागणी केली होती. पण याचिकेत केवळ नाशिक गुन्ह्याचा समावेश असल्याने याच प्रकरणात कारवाई न करण्याची सरकारची हमी सरकारी पक्षातर्फे देण्यात आली आहे. न्यायालयानेही सरकारचे म्हणणे मान्य करत 17 सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.

जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा उद्या होमपीचवर म्हणजेच कणकवलीत आहे. मात्र सिंधुदुर्गात जमावबंदी लागू करण्यात आलीय. त्यामुळे जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणूक आणि सभा घेण्यास मनाई आहे. जमावबंदीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. असं असलं तरी कणकवली आणि कुडाळमध्ये होणार्‍या सभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे.

तुम्ही कुणी माझं काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही.

नारायण राणे,केंद्रीय मंत्री

Exit mobile version