कर्तव्य बजावत असताना मृत्यूने गाठले
| पनवेल | वृत्तसंस्था |
तुर्भे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. प्रसाद सावंत असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेले प्रसाद सावंत (44) आपल्या पंधरा वर्षीय मुलासोबत डोंबिवली येथे राहात होते. सावंत हे गुरुवारी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांंतर्गत तुर्भे पोलिस ठाणे हद्दीतील महापे येथील बिट नं 1 येथे रात्रपाळीवर होते. पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान सावंत यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना नजीकच्या नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी साडेसहाच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्शवभूमीवर पोलिस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजा नामंजूर करण्यात आल्या आहेत. 1 डिसेंबरपासूनच अनेक कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजा नामंजूर केल्या गेल्याने पोलिस कर्मचारी तणावात आहेत. अशातच कर्तव्य बाजावताना सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत. याबाबत आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.