हमरस्त्यावर मोकाट गुरांचा सातत्याने रास्ता रोको

। पाली-बेणसे । वार्ताहर ।
नागरिक आधीच खड्ड्यांच्या समस्येने ग्रासलेले असतानाच एका नवीन समस्येने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील विविध हमरस्त्यावर मोकाट गुरांचा सातत्याने उपद्रव होत असल्याने प्रवासी तथा वाहनचालकांची डोकेदुखी वाढली असून आवश्यक त्या उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे. शिहू-नागोठणे-पोयनाड हा मार्ग प्रवासी तथा माल वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ सतत सुरू असते. अर्थातच खड्ड्यांमुळे हा मार्ग जिल्ह्मातील चर्चेचा भाग बनला आहे. यातच मोकाट गुरांचा सातत्याचा होणारा रास्ता रोको प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. शिहू नागोठणे परिसरात मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या देखील निर्माण होताना दिसत आहे. तर रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार व वाहनचालकांना रस्त्यात बसलेली गुरे दिसत नसल्याने गुरांना धडकून अनेकदा अपघात घडल्याच्याही घटना घडल्या आहेत. या मार्गावर गुरांच्या झुंज लागत असल्याने प्रवाशांना याचा अधिक धोका जाणवू लागला आहे.

तसेच अवजड वाहनांच्या धडकेत गुरांचा बळी जाण्याची देखील शक्यता असते. अशातच वाहनचालकांनी कितीही हॉर्न वाजविला तरी मोकाट गुरे जागची हालत नसल्याने यातून वाट कशी काढायची असा प्रश्‍न वाहनचालकांसमोर उभा राहत आहे. मोकाट गुरांचे मालक व शेतकरी गुरांचा वापर करून काम झाल्यावर बेफिफिकरपणे वागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणार्‍या या समस्येकडे कोणीच गांभीर्याने लक्ष दिले नसून प्रशासकीय स्तरावरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली महामार्ग, खोपोली पेण अलिबाग मार्ग, शिहू नागोठणे पोयनाड तसेच वाकण पाली खोपोली मार्गावर मोकाट गुरांची समस्या गंभीर झाली आहे. सदर मार्ग प्रवास व वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असावा याकरीता मालकांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत. याबरोबरच शासनप्रशासनाने देखील रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी जनमानसातून जोर धरत आहे.

Exit mobile version