| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या शासकिय कार्यालयासह शाळा, महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनदेखील करण्यात आले.
अलिबागमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयात संविधान दिन बुधवारी (दि.26) साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. यांनतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. तसेच अलिबागमधील चेंढरे येथील समाजकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक संस्थेमार्फत त्रिसरण व पंचशील घेण्यात आले. यावेळी महामानवाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानातील प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयासह शाळा महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला असून सामाजिक, शैक्षणिक आदी विविध संस्थामार्फत देखील हा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती देण्यात आली. संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
जिल्ह्यात संविधान दिन साजरा
