संविधानिक अधिकार हिरावता येणार नाहीत

मेधा पाटकर यांचे प्रतिपादन
। पुणे । वृत्तसंस्था ।
संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असून, यामध्ये अन्न, आरोग्य, शिक्षण, निवारा, रोजगार आदी घटकांचा समावेश आहे. हे संविधानिक अधिकार कुणालाही हिरावता येणार नाहीत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केले आहे. याशिवाय, न्यायाच्या या लढाईत मी तुमच्या सोबत आहे, असा संदेश त्यांनी भीमनगर येथील रहीवाशांना दिला आहे.
डीपी रस्त्याच्या विकासासाठी ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या कोथरुडमधील भीमनगर येथे आल्या होत्या. येथील रहीवाशांचे प्रश्‍न समजून घेत मेधाताईंनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, संविधानाची शपथ घेवून अधिकारी पदाचा स्विकार करतात. पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत. श्रमिकांच्या श्रमाचे मोल नाही आणि हक्काला दाद नाही. आणि म्हणून आम्ही घर बचाओ आणि घर बनाओ ही घोषणा दिली आहे.
जर विकासकामे करायची होती, तर इतके दिवस काय करत होते. जमिनीचा विकास करायचा म्हणतात. पण त्यासाठी वस्तीतील लोकांची सहमती घेतली का, त्यांना नियोजन आराखडा दाखवला का असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. तर, आमची वस्ती घोषीत झोपडपट्टी आहे. आम्ही आमच्या प्रश्‍नासाठी अधिकार्‍यांकडे वेळ मागतो. पण अधिकारी आम्हाला वेळ देत नाहीत, असे व्यथा बाल तरुण मंडळ या वस्तीतील दिव्यांग असलेले संजय बनपट्टी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी, लखीमपुरच्या सीमेवर शहीद झालेल्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. देवीदास ओव्हाळ, जावेद शेख, नेहा गायकवाड, मंगल कांबळे, रेश्मा पल्ला, सोनाली पोळ, वैशाली साळवे, आक्काबाई तोरडमल, सुभद्रा तोरडमल, रईसा शेख, वर्षा डेंगळे, सोजरबाई खरात आदी उपस्थित होते.

Exit mobile version