आंबेवाडी नाक्यावर सर्व्हिस रोड बनवा

निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यामुळे नागरिक आक्रमक

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील आंबेवाडी नाका येथे निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यामुळे प्रवास करणे मुश्कील झाले आहे. येथे तातडीने सर्व्हिस रोड बनवा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन रास्ता रोको केला. रस्त्याचे काम लवकरच लवकर व्हावे यासाठी नागरिक आक्रमक झाले होते. त्यामुळे येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

आंबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याची दयनीय अवस्था पाहता या ठिकाणी दररोज अपघात होताना दिसत असून आंबेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरु असताना याविषयी संबंधित ठेकेदार याला फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. याआगोदर संबंधित ठेकेदार याला लेखी अर्ज दिला होता. परंतु, ठेकेदाराने कोणतेही काम केले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच व्यापारी, रिक्षा संघटना आक्रमक होऊन आंबेवाडी नाका येथे एकत्र येते रस्ता रोको आंदोलन केले.

मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील चौपदरी करण्याचे काम गेली 12 वर्षांपासून सुरु असून कोणतेही प्रगती नाही. याउलट आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम करण्याच्या अगोदर दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम सिमेंट काँक्रेटने केले पाहिजे, असे ठेकेदाराला फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगण्यात आले होते. परंतु, ठेकेदाराने केराची टोपली दाखवली. शिवाय गटाराचे कामही निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे आंबेवाडी बाजारपेठेत पाणी जाण्यासाठी जागा राहिली नाही. त्यामुळे बाजारपेठेत पाणीच पाणी साचत आहे. यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत. एखाद्याचा नाहक बळी गेला तर, याला जबाबदार कोण?

यावेळी माजी सरपंच सुरेश महाबळे, माजी उपसरपंच कुमार लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, संजय कुर्ले, राकेश लोखंडे, महेंद्र वाचकवडे, विजय बोरकर, अविनाश पलंगे, दादा धुमाळ, मंगेश घायले, व्यापारी वर्ग, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते. वाहतूक कोंडी व्होऊ नये यासाठी स्थानिक पोलीसांनी मध्यस्ती करून रस्ता खुला करण्यात आला.

Exit mobile version