। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील रोहा बाजुकडे जाणार्या रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान, या मार्गावरून जाताना कारचालक थोडक्यात बचावला आहे. यामुळे ठेकेदारांनी केलेले काम किती निकृष्ठ दर्जाचे आहे, हे सिद्ध झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या आठरा वर्षांपासून सुरु आहे. अनेकवेळा या महामार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, तसेच दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पाहणी केली आहे. परंतु, निकृष्ठ दर्जाचे काम केलेल्या ठेकेदाराला कोणीही जाब विचारत नसल्यामुळे ठेकेदाराची मनमानी सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आंबेवाडी बाजारपेठेत भर रहदारीच्या चौकात गटाराच्या बाजूला भगदाड पडले आहे. काही दिवसांपूर्वी सुदैवाने एक कार चालक या खड्ड्यातून थोडक्यात बचावला असल्याचे स्थानिकांकडून सागण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम केले गेले असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्याचबरोबर कोलाड-गोदी नदीवरील जुना पुल तसाच ठेऊन दोन्ही बाजूचे कठडे फक्त नव्याने बांधण्यात आले आहेत. तसेच, वाकण जवळील गोडसई गावानजिक पुलाची अवस्थादेखील तशीच आहे. भुवन गावानजिक पुलाचा पत्ताच नाही तर, कठडे अजूनही तुटलेल्या अवस्थेत आहेत.