। पनवेल । प्रतिनिधी ।
जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य बॉक्सिंग स्पर्धा 2026 मध्ये पनवेलमधील एमपीएसए बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा यशाची मोहोर उमटवली आहे. मुख्य प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांच्या कुशल व खंबीर मार्गदर्शनाखाली उतरलेल्या या चमूने स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत विविध पदकांची कमाई केली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत एमपीएसए क्लबच्या सई कारंडे आणि विहंग पालवे यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्याचप्रमाणे बतुल साखरवाला हिने रौप्य पदक मिळवले, तर अहाना सोमण हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर कांस्य पदक जिंकून क्लबच्या शिरपेचात आणखी एक मानाचे पदक जोडले. या सुवर्ण यशासोबतच सई करंडे हिची आगामी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशामागे प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांचे अथांग परिश्रम आणि त्यांनी खेळाडूंकडून करून घेतलेली कसून तयारी कारणीभूत आहे.







