किशोर साळे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण पांडे यांनी कारभार हाती घेतला आहे. आता अलिबाग शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी प्रवीण पांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मावळते पोलीस निरीक्षक किशोर साळे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर साळे यांनी यापूर्वी अलिबाग, मुरूड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली. काही वर्षे या विभागात काम केल्यावर पोलीस निरीक्षक म्हणून रायगड पोलीस दलात पुन्हा बदली झाली. अलिबाग पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून त्यांच्याकडे गेली दोन वर्षे धुरा होती. किशोर साळे यांची आता पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. नागपूर पोलीस दलातील वाहतूक विभागात कार्यरत असणारे प्रवीण पांडे यांची अलिबागचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण पांडे यांनी पदभार स्वीकारला. वाहतूक विभागाचा अनुभव असलेले प्रवीण पांडे अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासह हद्दीतील गैरधंद्यांवर अंकुश ठेवण्यास यशस्वी ठरतील का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







