लाखो कासवाच्या पिल्लांना जीवदान; राज्यातील 56 किनाऱ्यांवर लाखो घरट्यांची नोंद
| अलिबाग | प्रतिनिधी |
शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत 2025-26 हंगामात राज्यातील 56 समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 1 हजार 724 कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली. या घरट्यांमधील तब्बल 1 लाख 08 हजार 596 कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले असून, एकूण उबवण यशाचे प्रमाण 61.20 टक्के नोंदविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदविण्यात आली असून, त्यामधून 54 हजार 227 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53 हजार 325 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले असून, 69.95 टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदविण्यात आले. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1 हजार 44 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातील आरावी, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे/पानंदे आणि कचरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी आणि कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांची घरटी नोंदविण्यात आली. यावरून महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या प्रजननासाठी अजूनही महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे अधोरेखित होते.
सन 2018 पासून कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या सहकार्याने मच्छिमारांसाठी नुकसानभरपाई योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांसह इतर संरक्षित समुद्री प्राण्यांना जाळे कापून जीवनदान देणाऱ्या मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यात येते. आतापर्यंत महाराष्ट्रात 486 समुद्री कासवांना वाचविण्यात मच्छिमार आणि वन विभागाला यश मिळाले असून, त्यासाठी मच्छिमारांना एकूण सुमारे 61 लाख 21 हजार 850 रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, समुद्री कासवे इजा किंवा संसर्गामुळे अनेकदा समुद्रकिनाऱ्यांवर जखमी अवस्थेत आढळतात. अशा कासवांची संख्या पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येते. जिवंत कासवं किनाऱ्यावर वाहून आल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कांदळवन कक्षामार्फत ‘मरीन रिस्पॉन्डंट गट’ स्थापन करण्यात आला आहे. या गटात महाराष्ट्र वन विभागाचे कर्मचारी (वनपरिक्षेत्र अधिकारी), कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा समावेश आहे.
सन 2011 पासून वाईल्डलाइफ कन्झर्व्हेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग (डहाणू विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे समुद्री कासवांसाठी उपचार व पुनर्वसन केंद्र चालविण्यात येत आहे. तसेच कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबई व परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर आढळणाऱ्या जखमी कासवांच्या उपचारासाठी ऐरोली येथे कासव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही तात्पुरती उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.







