| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पेपरफुटीविरोधात दिल्लीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन आणि अश्रुधुराच्या वापरावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून थेट सवाल केला आहे. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि लाठीचार्ज करण्याची मंजुरी तुम्ही दिली होती का? नसेल, तर हा आदेश नेमका कुणी दिला? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी 19 वर्षीय साहिल लोचब याचाही उल्लेख केला आहे. पॅलेट गनच्या गोळीबारामुळे त्याला डोळा गमावण्याचा धोका असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. पेपरफुटी थांबवावी आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी मागणी करणे हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवालही त्यांनी केला.
विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान साध्या वेशातील काही व्यक्ती विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करताना दिसल्या. हे लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांना तैनात करण्याची परवानगी कुणी दिली? याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत देश उत्तर मागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.






