मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
| चणेरा | प्रतिनिधी |
आदिवासी कोळी समाजातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी आणि ढोर कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावेत, तसेच 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कोळी महासंघातर्फे मंगळवारी अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करून संबंधित परिपत्रक जारी करावे, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलना दरम्यान कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, येत्या पावसाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. समाजातील विद्यार्थ्यांना, युवकांना आणि नागरिकांना जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रशासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात प्रा. अभय पाटील, ज्ञानेश्वर टिवळेकर, देवानंद घोगर, प्रवीण तांडेल, जयवंत अंबाजी, गोरक्षनाथ नवरीकर, सचिन चोरगे, पांडुरंग आरेकर, सूर्यकांत वाघमारे, सिद्धिका धसाडे, जलदीप तांडेल यांच्यासह कोळी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी कोळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







