केंद्र सरकारचा मोठा निर्णय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आता सर्दी-खोकला झाला म्हणून औषधांच्या दुकानात जाऊन थेट कफ सिरप विकत घेता येणार नाही. केंद्र सरकारने कफ सिरपच्या विक्रीबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. यापुढे डॉक्टरांच्या लेखी चिठ्ठीशिवाय कोणत्याही औषध दुकानात कफ सिरप मिळणार नाही. मध्य प्रदेशात दूषित कफ सिरपमुळे 22 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषध नियमावलीतील ‘शेड्यूल के’मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. या अंतर्गत कफ सिरपला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकण्याची असलेली सवलत आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. मात्र, खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चघळण्याच्या गोळ्या किंवा टॅब्लेट्स पूर्वीप्रमाणेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय उपलब्ध राहतील. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने यासंदर्भात मसुदा जारी करून हरकती मागवल्या होत्या, ज्यावर आता अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.






