। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील 6 हजार 751 ग्राहकांकडे महावितरणची 20 फेब्रुवारीपर्यंत 3 कोटी 39 लाख 90 हजार 537 रुपये एवढी थकबाकी आहे. दरम्यान, या थकीत रकमेच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत 725 ग्राहकांचा तात्पुरता वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी दिली आहे.
उरण तालुक्यात वाणिज्य, घरगुती आणि सार्वजनिक असे एकूण 67 हजार 911 ग्राहक आहेत. त्यामध्ये घरगुती 55 हजार 800, वाणिज्य 7 हजार 550 व औद्योगिक 680 ग्राहकांचा समावेश आहे. यापैकी घरगुती 5 हजार 490 ग्राहकांकडे 1 कोटी 17 लाख 50 हजार 530 रुपये, औद्योगिक 90 ग्राहकांकडे 1 कोटी 64 लाख 24 हजार 119 रुपये आणि वाणिज्य 1 हजार 171 ग्राहकांकडे 58 लाख 15 हजार 888 अशी एकूण 6 हजार 751 ग्राहकांकडे महावितरणची 20 फेब्रुवारीपर्यंत 3 कोटी 39 लाख 90 हजार 538 रुपये थकीत आहेत. यापैकी थकीत असलेल्या 725 ग्राहकांना थकीत बीलांची रक्कम जमा करण्यासाठी वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही बीले भरण्यास दिरंगाई करणार्या ग्राहकांवर तात्पुरता वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.