समाजोपयोगी कामांमध्ये सक्रिय सहभाग
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील बंड्या बॉईज संघ क्रिकेट या खेळात नेहमीच उत्तम कामगिरी पार पाडत असतो. त्याचबरोबर क्रिकेटच्या बाहेरील दुनियेतील लोकांना भेडसावणार्या समस्या, सामाजिक उपक्रम, गरजवंताला अभिप्रेत असणार्या गोष्टी याबाबत अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.
माथेरानमधील बंड्या बॉईज संघ हा केवळ क्रिकेट क्षेत्रापुरता मर्यादित नसून माथेरानच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व अन्य उपक्रमात नेहमीच सक्रिय सहभाग दर्शवत असतो. त्यामुळे बंड्या बॉईज या संघाला एक संस्थेच्या रुपात जरी पाहिले असता यात काही वावगे ठरणार नाही. कोरोना काळात भयंकर महामारीचा त्रास सहन करत असताना सर्वत्र हाहाकार माजला होता. यावेळी माथेरानकर सुद्धा अनेक समस्यांशी झुंजत होते. या दिवसांमध्ये बर्याच संस्था माथेरानला अन्नधान्य किट, घोड्यांसाठी भुसा अशा स्वरूपात मदत करत होते. बाहेरून जरी मदत आली असली तरी सर्व सामान्यांपर्यंत ती मदत पोहचवणे फार कठीण व संघर्षमय काम होते. कारण एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता होती. परंतु, या दिवसांमध्येही बंड्या बॉईज संघातील खेळाडूंनी अन्नधान्याचे किट व घोड्यांसाठी लागणारा भुसा घरोघरी पोहोचता केला होता.
त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारी ही मुले स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, सामूहिकरित्या श्रमदान अशा बर्याच समाजोपयोगी कामांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. क्रिकेट क्षेत्रात सुध्दा उत्तुंग भरारी घेत असताना या खेळाडूंनी सामाजिक सलोखा जपला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये बंड्या बॉईज संघाचे कुलदीप जाधव, योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर रांजाणे, ओमकार रांजाणे, आदित्य भिल्लारे, अरुण शेट्ये, तेजस कदम, संजय कदम, विशाल बिरामणे, यश शिंदे, कुमार शेट्ये, विजय कदम, अंकित पार्टे, प्रमोद कदम, तनुज शिंदे, सौरव कदम, रोहित बिरामणे, किरण पार्टे, निमेश दळवी, चैतन्य शिंदे, रोहित शिंदे, योगेश घावरे, सतीश शिंदे, अनुज पार्टे ही मुले सक्रीय कार्यरत आहेत.