फणसाप रामराज कूदे रस्ता दुरुस्ती
महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील रामराज विभागातील रामराज कुदे रस्त्याची दुरावस्था झाली होती त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नाही तर शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा सुडकोली ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शेकापचे युवा नेते रमेश पाटील यांनी दिला होता. या इशार्याची दखल घेत चित्रलेखा पाटील यांच्या पाठपुराव्याने फणसापुर रामराज कूदे रस्त्याचे काम सुरू झाले असल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत शेकाप आणि चित्रलेखा पाटील यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.
अलिबाग-रोहा रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नंतर नरमलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अलिबाग वावे या रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र या पुढील रस्ता संपूर्णपणे सुस्थितीत करण्यात आलेला नव्हता. रामराज कुदे या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती. रस्ताच गायब झाला असल्याने फक्त खड्डेच राहिले होते. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणार्यांना अतिशय हालअपेष्टा सहन करावी लागत होती.
याबाबतचे गार्हाणे शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी ताबडतोब सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जगदिश सुखदेवे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधत सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्य अभियंता सुखदेवे यांनी ही मागणी मान्य करीत दुरुस्तीला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पुन्हा एकदा शेकापच्या माध्यमातून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा चित्रलेखा पाटील आणि रमेश पाटील यांनी दिला होता. त्यानुसार या इशार्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती सुरू केली.