माथेरानमध्ये बंदी असताना लोखंडी पत्रे ठोकून बांधकाम?

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरात जंगली प्रदेश असल्याने वन्यप्राणी यांना झाडांवरील सहज फेरफटका मारता यावा यासाठी वन विभागाच्या जमिनीवर बांधकामे करताना लोखंडी पत्रे उभे करण्यास आणि तारेचे कुंपण घालण्यास बंदी आहे. वन विभागाकडून त्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असते. मात्र, माथेरानमधील नेहरू भवनाच्या मागील बाजूस लोखंडी पत्रे उभे करून काही बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, त्या ठिकाणी आतमध्ये काय चालले आहे याची कोणतीही माहिती बाहेरील कोणाला लोखंडी पत्रे यांच्या मधून बघण्याचा प्रयत्न केला तरी दिसून येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने लोखंडी पत्रे ठोकून बांधकाम सुरू आहे, याबद्दल उत्सुकता आहे.

माथेरान हे शहर आणि त्या शहराच्या आजूबाजूचा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. तेथील 54 चौरस मीटर जंगलात कुठेही लोखंडी तारा वापरून कुंपण घालण्यास आणि पक्के कुंपण बांधण्यास बंदी आहे. मात्र, सध्या माथेरान डंपिंग ग्राऊंड ते सेसिल हॉटेलमार्गे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला मोठ्या भागात लोखंडी पत्रे उभे करून आतमध्ये काही कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी गेली काही महिने लोखंडी पत्रे रस्त्याच्या कडेला उभे करून आतील भागात काही कामे सुरू आहेत, मात्र त्या कामांबाबत काही माहिती मिळत नाही.

नेहरू भवनच्या मागील बाजूस असलेल्या सेट व्हीला या एमपी प्लॉट 47 वरील जमिनीवर लोखंडी पत्रे उभी करून काय सुरू आहे याची कोणतीही माहिती स्थानिक पातळीवर नाही. त्याचवेळी तेथे उंचावर एक हेरिटेज बंगला असून, त्या बंगल्याच्या तीन-चार एकर जमिनीला कुंपण घालण्यात आले असल्याने तेथे रिसॉर्ट बांधण्याचे काम सुरू आहे की अन्य, याबाबतदेखील गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यात हा परिसर जंगल संपत्तीने नटलेला असल्याने असंख्य झाडांच्या मध्ये असलेला उंच टेकडीवरील बंगलादेखील यापूर्वी सहजासहजी बाहेरून दिसून येत नसे एवढी प्रचंड झाडी त्या भागात होती. त्यामुळे झाडांच्या गर्दीत लोखंडी पत्रे उभे करून काही अनधिकृत बांधकाम तर होत नाही ना, असा सवालदेखील निर्माण होत आहे. माथेरानमधील जंगलाचे राखणदार असलेल्या वनविभागाकडून त्या प्रकाराबद्दल कारवाई केली जात नसल्यानेदेखील संशय व्यक्त होत आहे.

Exit mobile version