| पनवेल | वार्ताहर |
उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून कारवाई करण्यात आली.
स्थळ पाहणी अहवालानुसार एकूण 34 बांधकामस्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे.
यापूर्वी महापालिकेच्या वतीने एकूण 169 बांधकाम प्रकल्पांना, स्थळांना उपाययोजना करणेबाबत अथवा काम बंद करणेबाबाबत इशारावजा जाहीर नोटीस देण्यात आलेली होती. संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही काही व्यवसायिकांनी अपेक्षित कार्यवाही न केल्याचे दिसून आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या साहित्यावर नियमाप्रमाने पाणी न शिंपडणे, वाहन स्वच्छता न करणे, तसेच ब्लास्टिंग करतानाच्या मानक कार्यपद्धतीचे पालन न करणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या. सदर कारवाई दरम्यान संबंधितांना तात्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा व पर्यावरण संरक्षण याबाबत पनवेल महानगरपालिका कटिबद्ध असून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासण्या व कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विभागनिहाय कारवाई
कळंबोली विभाग - 10 बांधकाम प्रकल्प
कामोठे विभाग - 09 बांधकाम प्रकल्प
नवीन पनवेल, पनवेल विभाग - 15 बांधकाम प्रकल्प
एकूण : 34 बांधकाम प्रकल्पांवर कारवाई
