नेरळ-कळंब राज्य मार्गावर नवीन पुलाची उभारणी

पुलासाठीचा करोडोंचा खर्च पाण्यात?; पुलाच्या पायाखालील काँक्रिटीकरण गेले वाहून

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील दहिवली मालेगाव येथे उल्हास नदीवर नवीन पूल बांधला जात आहे. या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, काही पिलर उभे राहिले आहेत. मात्र, त्या पिलरखालील काँक्रिटीकरण पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराचे चोचले पुरविण्यासाठी कार्य करते काय? असा प्रश्न निर्माण झाला असून, बांधकाम विभाग जनतेसाठी काम करतो की ठेकेदारासाठी असा प्रश्न स्थानिक वाहनचालक उपस्थित करू लागले आहेत.

माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेला जुना पूल 40 वर्षे पूर्वी बांधण्यात आलेला आहे. त्यात त्यावेळी बांधलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरील महापुराची पाणी वाहून जाते आणि त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते. त्यामुळे उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षे सुरु आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून नवीन पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळावी आहे. आ. महेंद्र थोरवे यांच्याकडून या पुलाची मागणी गेली पाच वर्षे सरकारकडे होत होती. या पुलाची गरज असताना आणि दरवर्षी पावसाळ्यात हा पूल चार ते पाच वेळा पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम तकलादू बनले आहे. यावर्षी तर पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती.

2024 पासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, ठेकेदार कंपनीसाठी हा पूल बांधला जात आहे की वाहने आणि जनतेसाठी? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असतानादेखील बांधकाम विभाग संबंधित कामाचा ठेका घेणारे ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याची तसदी घेत नाही. त्याचवेळी पुलाचे कामासाठी 18 महिन्यांचा कालावधी संपून गेला तरी पुलाचे अर्धे कामदेखील पूर्ण झालेले नाही, अशी स्थित उल्हास नदीवरील या पुलाची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे दहिवली मालेगाव पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर नियंत्रण नसल्याने दीड वर्षात केवळ आठ पिलर उभे करण्याशिवाय कोणतेही काम झाले नाही. त्यात पुलाचे सर्व पिलरदेखील बांधकाम विभाग उभे करून घेण्यात यशस्वी ठरलेला नाही. आता तर आणखी कठीण समस्या निर्मण झाली असून, पुलाच्या कामासाठी बांधण्यात आलेल्या पिलारचे पायाजवळील सिमेंट काँक्रिटीकरण पावसाळ्यात वाहून गेले आहे. त्यामुळे पिलरला धोका निर्माण झाला असून, पुलाची उभारणी पूर्ण झालेली नसताना दहिवली मालेगाव येथील पुलाची ही स्थिती वाहनचालक यांच्या पोटात गोळा निर्माण करणारी ठरत आहे.

दहिवली मालेगाव पुलाचे काम जनतेसाठी सुरु आहे की ठेकेदासाठी असा प्रश्न आम्हला पडला आहे. या पुलाचे बांधकाम सुरु होऊन दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पुलाचे खांबदेखील उभे करून घेण्यात बांधकाम खाते निष्प्रभ ठरले आहे. 2024मध्ये पुलाच्या कामाला झाली असून, दीड वर्षात पुलाची उभारणी दूर; पण पुलाचे खांबदेखील उभे राहिले नसल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाका.

श्रावण जाधव,
रिक्षाचालक

Exit mobile version