शिवतीर्थ श्रीरामनगर वेल्फेअर ट्रस्टचा पुढाकार; 10-12 हजार लीटर क्षमतेचा तलाव तयार
| वावोशी | प्रतिनिधी |
खोपोली परिसरातील वन्यजीव आणि पक्षांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने शिवतीर्थ श्रीरामनगर वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठा (तलाव) उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. वनपाल भगवान दळवी व तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या परिसरात वन्यजीवांना पिण्यासाठी कोणताही पाणवठा उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रस्टच्या सदस्यांनी पुढाकार घेत वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन खात्याच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ट्रस्टचे महिला, पुरुष तसेच बाल मावळ्यांनी अथक परिश्रम घेत अवघ्या दोन दिवसांत मोठ्या आकाराचा कृत्रिम तलाव तयार केला. या तलावात सुमारे 10 ते 12 हजार लीटर पाणी साठवण्याची क्षमता असून त्यामुळे परिसरातील वन्यजीव, प्राणी आणि पक्षांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या पर्यावरणपूरक उपक्रमात परिसरातील जयेश मोरे, शैलेश फावडे आणि अंकुश फावडे यांनीही मोलाचे सहकार्य केले. या मोहिमेत ट्रस्टचे उपाध्यक्ष विशाल रामदास वाळुंज, सेक्रेटरी आशिष रामचंद्र खोपकर, खजिनदार किरण बुधा पाटील तसेच सदस्य राजेश पाटील, विशाल चव्हाण, ज्ञानेश्वर जगताप, राकेश रामचंद्र मिरवणकर आणि प्रदीप देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच महिला सदस्या सुवर्णा विशाल वाळुंज, नेहा ज्ञानेश्वर जगताप आणि सौ. ज्योती राकेश मिरवणकर यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. याशिवाय साईदीप रितेश घावटे, भावार्थ किरण पाटील, साई ज्ञानेश्वर जगताप आणि गोलू देशमुख या लहानग्या मुलांनीही या उपक्रमात मनापासून मेहनत घेतली.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात वनवा लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्था वन विभागासोबत पुढाकार घेऊन असे उपक्रम राबवत असतील, तर पर्यावरण संवर्धनाला मोठी मदत होईल, असे मत तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. वन्यजीव संवर्धनासाठी करण्यात आलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, शिवतीर्थ श्रीरामनगर वेल्फेअर ट्रस्ट सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
उन्हाळ्याच्या काळात वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न असतो. अशावेळी स्थानिक सामाजिक संस्था पुढे येऊन कृत्रिम पाणवठे तयार करतात, ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. समाज आणि वन विभागाने एकत्रितपणे काम केले तर वन्यजीव संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल.
– राजेंद्र पवार, वन अधिकारी, खालापूर







