नागरिकांची गैरसोय होणार दूर
| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पनवेल येथे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांच्या पाठपुराव्याने प्र.क्र.18 मधील गार्डन हॉटेल येथील न्यू मॉडर्न स्वीटसमोर कंटेनर टॉयलेट उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. प्र.क्र.18 हे महानगर पालिकेचे प्रवेशद्वार आहे. गार्डन हॉटेल येथून हजारो नागरिक पनवेलमध्ये प्रवेश करतात. स्वामी नित्यानंद मार्ग येथूनच सुरुवात होतो व सदरच्या रस्त्यालगत अनेक मोठी रुग्णालये, तालुका पोलीस ठाणे, न्यायालय, नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल पालिका मुख्यालय स्थित आहेत. येणार्या नागरिकांची विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक यांची पूर्ण रस्त्यावर शौचालय नसल्यामुळे गैरसोय होत होती. नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आयुक्त यांना शौचालय उभे करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले व त्याचा सातत्याने पाठपुरावा करत राहिल्या. याकरिता विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा चिटणीस गणेश कडू यांचे मार्गदर्शन व सर्व सहकारी यांचे सहकार्य मिळाले. टॉयलेट उभारणीकरिता प्रशासनाने केलेले सहकार्य याबद्दल नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी आभार मानले.