। नेरळ । प्रतिनिधी ।
उल्हास नदीवरील दहिवली-मालेगाव येथील पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला होता, मात्र अत्यंत संथगतीने पुलाचे बांधकाम सुरु असून त्याबद्दल या पुलासाठी पुढाकार घेणारे माजी सभापती अमर मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने 22 कोटींचा निधी पुलाच्या उभारणीसाठी मंजूर केला आहे.
माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीवर मालेगाव दहिवली येथे 1975 चे काळात पूल बांधण्यात आला.त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्याकडे या तालुक्याचे तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्या 180 मीटर लांबीच्या पुलाचे उंची कमी असल्याने त्या पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात महापुराची पाणी जाते.
मागील काही वर्षे एका दोनदा नाही तर अनेक वेळा पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद होण्याची समस्या निर्माण होत असते. त्यात सातत्याने पुलावरून पाणी जात असल्याने पुलाचे बांधकाम देखील निकामी होते आणि त्यामुळे धोका निर्माण होत असतो. हे लक्षात घेऊन या भागातील कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी स्थानिक आमदारांकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. एका पाहणीमध्ये आमदारांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर या पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली असून 22 कोटींची मंजुरी या पुलाच्या कामाच्या अंदाजपत्रकास दिली आहे. गतवर्षी मे 2024 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर ते काम पुढील सहा महिने बंद पडले होते. त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र संथगतीने सुरु असलेले पुलाचे बांधकाम यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास 2026 उगवणार आहे. त्याबद्दल या पुलाच्या मंजुरीसाठी आमदारांकडे पाठपुरावा करणारे माजी सभापती अमर मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात पाणी जात असते आणि त्यावेळी हा पूल वाहतुकीस बंद होऊन दोन्ही बाजूंचा रस्ता बंद होतो. त्यामुळे बांधकाम विभागाने पुलाच्या कामाला गती द्यावी अशी आमची मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग
पुलाच्या कामाला गती देण्यात आली असून पुणे येथील ठेकेदार कंपनी कडून हे काम वेगाने करण्यात येणार असून मे 2025 पूर्वी सर्व 14 पिलर उभे करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.
संजीव वानखेडे, उप अभियंता