। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत पाली पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित सुधागड तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांना अध्यापन करणार्या शिक्षकांचे ‘शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण 2.0’चा पहिला टप्पा 17 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत चिवे आश्रम शाळेत संपन्न होत आहे. हे प्रशिक्षण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे आणि वरिष्ठ विस्तार अधिकारी साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झाले असून शालेय शिक्षण स्तरासाठी 5+3+3+4 असे दोन स्वतंत्र राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत सर 2023 व शालेय शिक्षण 2024 मध्ये शिक्षणाची लक्ष्य, ध्येये, क्षमता, अध्ययन निष्पत्ती, पंचकोश विकास अशा विविध संकल्पना या प्रशिक्षणातून स्पष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच, प्रत्येक मुल शिकले पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कौशल्य शिक्षणास प्रोत्साहन दिले पाहिजे, घोकंपट्टी आधारित शिक्षण कमी करण्यासाठी व कृतीवर आधारित अध्यापनशास्त्रात बदल घडवण्यासाठी सर्व शिक्षकांनी सक्षम होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःमध्ये नवीन बदल आत्मसात करून दैनंदिन अध्ययन अध्यापनात नवनवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा 360 अंश डिग्री अहवाल तयार करणे, शालेय स्तर तर्क रचना, पंचकोश विकास भारतीय परंपरेचा पाया यावर आधारित सखोल मार्गदर्शन सर्व सुलभक करत आहेत.
या शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणासाठी प्राथमिक विभागाचे सुलभक गोरख आघाव, आनंदा पाटील, जयेश साजेकर, आदिनाथ फुंदे, राकेश गदमले, संजय थळे, राजेश गायकवाड, इंगळे, अमोल ठोकल तर माध्यमिक विभागातून मंदार सिनकर, विक्रम काटकर, नागथाने, जनार्दन भिलारे, गिते, तृप्ती मराठे हे आपल्या अनुभवातून व मिळालेल्या ज्ञानातून प्रशिक्षण देत आहेत. दरम्यान, शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण वर्गाला सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी भेट देऊन आढावा घेत तालुक्याच्या गुणवत्ता विकासाबाबत सर्व शिक्षकांसोबत हितगुज साधले व प्रशिक्षण वर्गाला शुभेच्छा दिल्या.