| पनवेल | वार्ताहर |
रणरणत्या उन्हात पनवेल तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. उष्माघातामुळे लोकांना त्रास होऊ नये यासाठी पनवेल तालुका आरोग्य विभागाने पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केला आहे. चोवीस उपकेंद्रांवर जनजागृती करण्यात येत आहे.
जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. उष्माघातामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. तालुक्यात उष्माघातामुळे जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. तालुका आरोग्य विभागाच्या माध्यमातून आजीवली, आपटा, वावंजे, नेरे, गव्हाणच्या अधिपत्याखाली असणार्या चोवीस उपकेंद्रांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. प्रत्येक कक्षात लागणार्या प्राथमिक गरजेची पूर्तता केली जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते यांनी दिली. उष्माघातापासून खबरदारी म्हणून तालुका आरोग्य विभागाच्यावतीने खबरदारीच्या उपायोजना केल्या जात आहेत. शेतमजूर, शेतकरी, बांधकाम कामगार, फेरीवाले, हात गाडीवाले कडक उन्हात उपजीविकेसाठी राबतात. त्यांना उष्मघाताचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. खेडेगावात, आदिवासी पाड्यात, डोंगराळ भागात राहणार्या लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. या लोकांसाठी पनवेल तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे.
तापमानातील बदलामुळे नागरिकांनी डीहायड्रेशनपासून वाचण्यासाठी लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हात बाहेर जाताना गॉगल, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत घरी कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास कुलर्स, वातानुकुलीत यंत्राचा वापर करावा.