। अलिबाग । वार्ताहर ।
केळघर मार्गे मुरुड-रोहा मार्गावरील गोपाळवट येथे बसस्थानकाजवळ निवाराशेडची उभारणी करण्यात आली आहे. दुर्गम भागातून जाणार्या या मार्गावरील वाटसरु, दुचाकीचालकांना उन्हा-पावसात या निवाराशेडखाली क्षणभर थांबण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे. याचे उद्घाटन शुक्रवार (ता. 15) गावचे अध्यक्ष महादेव भुवड यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानातून या निवाराशेडचे काही दिवसातच काम पुर्ण झाले. केळघर मार्गे मुरुड ते रोहा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. या ठिकाणी निवाराशेड नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत असत. ही गैरसोय लक्षात घेऊन गंगायण प्रतिष्ठानने सहकार्य करत निवारा शेड उभारण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांसमोर ठेवला होता.गोपाळवट येथील गंगायण प्रतिष्ठानने यासाठी आर्थिक सहकार्य केले. यावेळी हरिचंद्र भुवड, भाऊ डिके, जानू दुसार, लक्ष्मण पौर्णेकर, बाळाराम भुवड, रामचंद्र किंजळे, विठ्ठोबा दुसार, मधुकर भुवड, पांडुरंग पानगले, महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.