ग्राहक होणार वीजनिर्मितीदार

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

सर्वसामान्य वीज ग्राहकांना आता वीजनिर्मितीदार होता येणार आहे. रूफ टॉप सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज नियामक आयोगाने नेट मीटरिंगच्या माध्यमातून पाच मेगावॅटपर्यंत वीज ग्रीडमध्ये टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांना एकत्र येत आपल्या घराच्या, गोडाऊन, कारखान्याच्या छतावर सोलर पॅनल लावून दिवसभर तेथे तयार होणारी हजारो युनिट वीज वितरण कंपनीला पुरवता येणार आहे. त्यामुळे संबंधितांना आर्थिक उत्पन्न मिळू शकणार आहे.

औष्णिक वीज प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच, पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून रूफ टॉप सौर प्रकल्प उभारून त्यामाध्यमातून तयार होणारी वीज आतापर्यंत ग्राहकाला वापरता येते. तसेच, उर्वरित वीज नेट मीटरिंगच्या माध्यमातून ग्रीडमध्ये टाकली जाते. आतापर्यंत केवळ एक मेगावॅट वीज नेट मीटरिंगच्या माध्यमातून ग्रीडमध्ये टाकता येत होती. त्यामुळे रूफ टॉप सौर ऊर्जानिर्मितीवर मर्यादा येत होत्या. पण, आता वीज आयोगाने ग्राहकांना ग्रुप रूफ टॉप सौर प्रकल्प उभारून त्यामध्ये तयार होणारी पाच मेगावॅटपर्यंत वीज ग्रीडमध्ये टाकता येईल, असे स्पष्ट केले आहे. वीज आयोगाने नेट मीटरिंगद्वारे ग्रीडमध्ये वीज टाकण्याची मर्यादा वाढवल्याने राज्यातील रूफ टॉप सौर प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

Exit mobile version