वरंध घाट 15 ते 31 मेपर्यंत बंद राहणार
| रायगड | खास प्रतिनिधी |
पावसाळा जवळ आल्याने वरंध घाटातील कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी 15 ते 31 मे या कालावधी हा मार्ग सर्व वाहतुकीस बंद केला आहे. प्रवाशांना पुन्हा ताम्हिणी अथवा महाबळेश्वरमार्गे पुणे असा लांबचा पल्ला गाठावा लागणार असून, ही प्रवाशांसाठी खर्चिक बाब ठरणार आहे. अधिकचा वळसा पडत असल्याने वाहन चालक आणि पर्यटक मात्र चांगलेच वैतागले आहेत.
पावसाळ्यात होणार्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दगड मातीचे ढिगारे रस्त्यावर येतात. त्याचप्रमाणे रस्ते व संरक्षक भिंती त्यामध्ये वाहून जातात. त्यामुळे भोरमार्गे पुणे जाणारा मार्ग गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाळ्यात बंद ठेवण्यात येत आहे. या मार्गाच्या मजबुतीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरु आहे. गेल्यावर्षी राजेवाडी फाटा ते भोरमार्गे पुणे या रस्त्याला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. हा दुपदरी रस्ता काँक्रिटचा करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून, बहुतांश काम पूर्ण झाले आहे. परंतु, पारमाचीवाडी ते रायगड जिल्हा हद्द या ठिकाणचे काम अपूर्ण आहे. येथे काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. यासंदर्भातील अभिप्राय जिल्हाधिकारी रायगड यांनी पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागवले होते.
त्यानंतर काही दिवसासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, एप्रिल-मे महिन्यातील लग्नसराईत पुण्याकडील लोकांना कोकणात येण्यासाठी पडणारा वळसा विचारात घेता या मार्गावरील वाहतुक काही दिवसांसाठी पुन्हा सुरु केली गेली होती. पावसाला सुरुवात होण्याआधी कामाचा निपटारा होणे गरजेेचे आहे. यासाठी 15 मेपासून हा मार्ग सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
वरंध घाटात काम सुरु करण्यात आल्याने आता अधिकचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे इंधनाच्या खर्चात आणि वेळेत वाढ झाली आहे. आधी माहिती असते तर हा मार्ग निवडला नसता, असे पर्यटकाने सांगितले.