| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील पुगाव गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि.15) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जेएनपीटीहून महाडच्या दिशेने धोकादायक रसायन
घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. कंटेनरमधून अत्यंत ज्वलनशील 2–2- (-) रसायनाची वाहतूक सुरू होती. अपघातानंतर कंटेनरच्या मॅनहोलमधून
रसायनाची गळती सुरू झाल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच एसव्हीआरएसएस टीम, येरुणकर क्रेन सर्व्हिस, महामार्ग पोलीस आणि कोलाड पोलिसांसह संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पथकांनी खबरदारी घेत गळती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या. रसायन ज्वलनशील असल्याने ठिणगी अथवा आगीचा कोणताही स्रोत निर्माण होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी ‘नो मोबाईल झोन’ लागू करण्यात आला. तसेच बचावकार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी खांब ते कोलाडदरम्यानची महामार्ग वाहतूक सुमारे एक तास थांबविण्यात आली. सर्व यंत्रणांमधील समन्वय आणि तत्परतेमुळे रसायनाची गळती नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे संभाव्य आग, स्फोट, जीवितहानी आणि मोठे आर्थिक नुकसान टळले.







