जेएनपीटीतून कंटेनर डबल डेकर ट्रेन सुरु

। जेएनपीटी । अनंत नारंगीकर ।
जेएनपीटी बंदरातुन सोमवार (दि.20) पासून डबल डेकर कंटेनर ट्रेनला सुरुवात झाली आहे. या सेवेमुळे बंदरातुन आयात-निर्यात होणार्‍या मालासाठी होणारा वाहतूकीचा खर्च आणि वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. या मालवाहू डबल डेकर ट्रेन सेवेला सोमवारी केंद्रीय बंदरे, नौकावहन, जलमार्ग, आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यानंतर कंटेनरची डबल डेकर कंटेनर ट्रेनद्वारा आयसीडी कानपूरला रवाना करण्यात आली आहे.

जेएनपीटीने बंदरातून सुरू केलेल्या डबल डेकर ट्रेन सेवेमुळे जेएनपीटी बंदराला याचा फायदा होणार आहे. डबल डेकर वाहतूक होणार्‍या कंटेनरची उंची सामान्य आयएसओ कंटेनरपेक्षा 660 मिमी कमी असल्याने त्याचाही एक लॉजिस्टिक लाभ होतो. कंटेनरची ऊंची कमी असल्याने असे कंटेनर लोड केलेले ट्रेलर ग्रामीण, अर्ध शहरी आणि शहरी रस्त्यांवरील मर्यादित उंचीच्या भुयारी मार्गांमधून आणि विद्युतीकरण विभागात लेव्हल क्रॉसिंगमधून सहजरित्या जाऊ शकतात.तसेच आयात-निर्यात मालाची वाहतूक करणार्‍या व्यावसायिकांना मालाची स्पर्धात्मक दराने वाहतुक करता येणार आहे. पर्यायाने बंदरातून रेल्वेद्वारे होणार्‍या मालवाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

डबल डेकर कंटेनरची एकावर एक ठेवून वाहतुक केल्याने 67 टक्के अधिक मालाची वाहतुक होते. तसेच 40 टन क्षमतेच्या आयएसओ कंटेनरच्या तुलनेत डबल डेकर कंटेनर ट्रेनमधून 71 टन मालाची वाहतूक केली जाऊ शकते. याशिवाय भारतीय रेल्वेद्वारा डबल स्टॅक आयएसओ कंटेनर गाड्यांच्या तुलनेत डबल स्टॅक डबल डेकर कंटेनर मालवाहतुकीच्या शुल्कामध्ये 17 टक्के सूट दिली जाणार आहे. परिणामी गुंतवणुकदारांना शुल्कामध्ये एकूण 33 टक्के खर्च कमी होणार आहे. अशा प्रकारे डबल डेकर कंटेनरची रेल्वेद्वारे वाहतुक झाल्याने आयात-निर्यात मालवाहतुक खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भारतीय मालाची निर्यात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक दराने करता येणार आहे.

या डबल डेकर कंटेनर मालवाहतुकीच्या सेवेमुळे मालाची निर्यात अधिक स्पर्धात्मक दराने होईल आणि भारतातुन निर्यातीमध्ये वाढ होईल. एक सशक्त लॉजिस्टिक क्षेत्र विकसित झाल्यास उत्पादन क्षेत्रातील महत्वपूर्ण देश बनण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच मेक इन इंडियाला सुद्धा प्रोत्साहन मिळू शकेल. जेएनपीटी बंदरात ही सेवा सुरु झाल्याने जेएनपीटीमध्ये व्यवसाय वृद्धि होण्यास, प्रवेशद्वार व रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे. डीपीडी सेवेमध्ये वाढ होईल. ज्यामुळे वाहतुकदारांचा वाहतुक खर्च आणखी कमी होईल. शिपिंग कंपन्यांच्या कंटेनरचा टर्नअराउंड वेळ कमी होण्याबरोबरच कंटेनरच्या कमतरतेच्या समस्यांचे देखील निराकरण होण्यास मदत होईल. या अनुषंगाने, कंटेनर डेपोसाठी जेएनपीटी कंटेनर टर्मिनलमधील एक ठिकाण निश्‍चित करण्यात आले आहे. या डेपोमध्ये आयएसओ कंटेनरमधून ड्वार्फ कंटेनरमध्ये कार्गो हस्तांतरण केले जाईल आणि त्यामुळे निर्यात मालाच्या रिपोजिशनिंग साठी बंदरातच रिक्त आयएसओ कंटेनर उपलब्ध होतील. सध्या व्यापार वर्गास निर्यातीसाठी आयएसओ कंटेनरच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे अशा स्थितिमध्ये हा उपक्रम गेम चेंजर ठरू शकतो. कारण कंटेनरची टर्नअराऊंड वेळ कमी होण्याबरोबरच आयात आयएसओ कंटेनरला देशांतर्गत दूरवरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. या डेपोमध्ये आयएसओ कंटेनरमधुन माल खाली करून ड्वार्फ कंटेनरमध्ये हस्तांतरित केला जाईल व रिकामे आयएसओ कंटेनर निर्यात सामग्रीसाठी जवळच्या सीएफएस आणि कारखान्यासाठी सहज उपलब्ध होतील.

जेएनपीटीने बंदर क्षेत्रातील डेडिकेटेड ड्वार्फ कंटेनर डेपो (डी-डेपो) चे व्यवस्थापन, देखभाल आणि संचालन करण्यासाठी सार्वजनिक निविदेद्वारे प्रिस्टाईन मेगा लॉजिस्टिक पार्क प्रा. लिमिटेडची ऑपरेटर म्हणून नियुक्ती केली आहे. जेएनपीटी बंदरात ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवा सुरू झाल्यामुळे बंदराच्या परस्पर जोडलेल्या लॉजिस्टिक व्यापार मार्गांमध्ये आणखी विविधता येईल. शिवाय, या सेवेमुळे जेएनपीटी आयात-निर्यात समुदायाच्या वाहतुक खर्चामध्ये सुद्धा कपात करू शकेल. त्याचबरोबर रेल्वे तसेच एकूण कंटेनर व्यवसायामध्ये वाढ तसेच प्रवेशद्वार व रस्त्यांवरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल व डीपीडी सेवेस सुद्धा प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वास जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी बंदरे, नौकायन व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव डॉ. संजीव रंजन, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ, बंदरातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version