। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील बारवाई पुलाजवळ एका कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत, कोणताही पूर्वइशारा किंवा पार्किंग सिग्नल न देता. आपला कंटेनर धोकादायक वळणावर उभा केल्याने सदर कंटेनरवर धडकून एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणातील फरार कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आकारा दादु पवार (23) असे असून, तो खालापूर तालुक्यातील नढाळ येथील रहिवासी आहे. आकाश आपल्या दुचाकीवरून पनवेल तालुक्यातील बारवाई पुलाजवळून जात असताना, येथील डाव्या बाजूच्या वळणावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या कंटेनरचा त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे आकाश दुचाकीसह सदर कंटेनरवर धडकला. या अपघातात आकाश गंभीर जखमी झाल्याने त्याचा काही वेळात मृत्यू झाला. या अपघातानंतर कंटेनर चालक इंद्रेशकुमार लालधर (46) याने जखमी तरुणाला कोणतीही वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला नाही, तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता तो घटनास्थळावरून पळून गेला. पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचा शोध सुरू केला आहे.






