कन्टेनरला कारची मागून धडक; दोघे ठार, तिघे जखमी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

अनेक वर्षापासून अपघातप्रवण क्षेत्र म्हणून सर्वशृत असलेल्या पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डॉ.आंबेडकर नगराच्या प्रारंभी शुक्रवारी सकाळी उभ्या कन्टेनरला कारची मागून धडक बसल्याने अपघात होऊन कारमधील दोघे ठार तर तिघे गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाले. यामुळे या ठिकाणी जीवघेण्या अपघातांची खंडित मालिका सुरू झाल्याची साशंकता या अपघातामुळे पोलादपूरांमध्ये निर्माण झाली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी असताना पोलादपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरासमोर अनेक वर्षांपासून अपघातप्रवण क्षेत्र अस्तित्वात होते आणि तेथे होणारे अपघात जीवघेणे असत. मात्र, चौपदरीकरणामुळे या अपघात घडण्याच्या घटना कमी होऊन तीव्रतादेखील कमी झाल्याची भावना पोलादपूरकरांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, या अपघातप्रवण क्षेत्रात स्वामी समर्थ मंदिरासमोर सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास येथे गोवा दिशेने जाण्यासाठी उभ्या असलेल्या कन्टेनरला भरधाव वेगाने कोकणाकडे जाणाऱ्या होण्डा बीआरव्ही कारची मागील बाजूने धडक बसून कारमधील चालक आणि कडेला बसलेली महिला असे दोघेजण जागीच ठार झाले. तर मागील सीटवर बसलेल्या तिघांनाही अतिशय गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन ते अत्यवस्थ झाले. अपघातात होण्डा बीआरव्ही कारच्या दोन्ही एअरबॅग्ज उघडून त्या कन्टेनरचे बीम घुसल्याने  फुटल्या. यामुळे पोलादपूर पोलीसांकडून अधिक माहिती प्राप्त करता चालक अनिल भीमा शिंदे (40) पुणे व सुमती यशवंत शिंदे (75) पुणे हे दोघे जागीच ठार झाले तर जखमी झालेले निलेश अनंत दळवी (50), जानवी निलेश दळवी (45), यश निलेश दळवी (18) तिघेही खानवली, लांजा येथील रहिवासी असून तिघांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे.

अपघाताचे वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाणे, कशेडी टॅप वाहतूक पोलीस तसेच महाड वाहतुक पोलीसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन स्थानिक नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले. यानंतर मृतदेह मृतांच्या मुळगांवी पाठविण्यात आले तर जखमींना मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले, असल्याची माहिती पोलीास निरिक्षक अनिल जाधव यांनी दिली. दरम्यान, कन्टेनरचालक अपघातस्थळावरून पसार झाल्याची माहिती प्राप्त झाली.

Exit mobile version