। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयाजवळ शिवशाही बस आणि इर्टिगा कारमध्ये मंगळवारी (दि. 30) भीषण अपघात झाला. या अपघात दोन जण ठार झाले असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर कामोठे येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
खेड तालुक्यातील जामगे येथे गणेशोत्सव जादा गाडीतील प्रवासी सोडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा शिवशाही गाडीचा चालक प्रकाश अर्जुन तरडे हा त्याच्या ताब्यातील खेड ते ठाणे ही रिकामी झालेली शिवशाही बस क्रमांक (एमएच 09 इएम 3530) घेऊन ठाण्याच्या दिशेने जात असताना मुंबईच्या दिशेने कोकणातील साखरपा येथील इर्टिगा कारला समोरासमोर ठोकर बसून अपघात झाल्याने एर्टिगा कार (एमएच 05सीव्ही 3299) घेऊन जाणारे चालक किरण घागे (28, घाटकोपर) आणि त्यांच्या शेजारच्या सीटवर बसलेले अंबरनाथ येथील जयवंत सावंत (60) यांना जोरदार मार बसला.

यावेळी जयवंत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक घागे याचा प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारादरम्यान कामोठे येथे रवाना केल्यानंतर महाडदरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील एर्टिगा कारमधील अन्य तिघे अंबरनाथ येथील गिरीश सावंत (34) आणि जयश्री सावंत (56) आणि बदलापूर येथील अमित भीतळे (30) हे तिघे जखमी झाल्याने कामोठे येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले.