| पुणे | प्रतिनिधी |
न्हावरा – तळेगाव रस्त्यावर न्हावरा येथे कंटेनर आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाली. रविवारी (दि.23) रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास गायकवाड (49), गौरी गायकवाड (20), दोघेही रा.ता. शिरुर. जि पुणे तसेच, गणेश निर्लेकर (25) जि. अहिल्यानगर हे मरण पावले. दुर्गा गायकवाड (48) या गंभीर जखमी झाल्या आहेत. यासंदर्भात रवींद्र सोनवणे जि. पुणे यांनी तक्रार दिली आहे. रविवारी रात्री कैलास गायकवाड हे मोटारीमधून पत्नी दुर्गा गायकवाड, मुलगी गौरी गायकवाड व मेव्हणे गणेश नेर्लेकर यांना घेऊन वाघोली येथून न्हावरेकडे येत होते. तळेगाव ते न्हावरे रस्त्यावरील संदीप महादेव सरके यांच्या घराशेजारी आल्यावर समोरून न्हावरे बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरची मोटारीला जोरात धडक बसली. अपघातात कैलास गायकवाड, गौरी गायकवाड, गणेश नेर्लेकर हे मरण पावले, तर दुर्गा गायकवाड या गंभीर जखमी झाल्या. कंटेनरचालक फरार झाला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोते तपास करीत आहेत .