| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील रासळ गावाजवळील सनशिल्ड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीजवळील नाल्यात रसायनयुक्त दूषित सांडपाणी सोडले जात आहे. हे पाणी आंबा नदीत मिळत असल्याने तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर योग्य कारवाई करावी. या संबंधीचे निवेदन ग्रामस्थ सचिन तेलंगे व पांडुरंग तेलंगे यांनी तहसीलदार दिलीप रायण्णावर यांना दिले.
कंपनीतील रसायनयुक्त सांडपाणी अनेक दिवसांपासून नाल्यात मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. हा नाला अंबा नदीच्या जवळ असल्याने नाल्यातील दूषित सांडपाणी थेट आंबा नदी पात्रात जाऊन मिळत आहे. अंबा नदीजवळ अनेक गावे आहेत. तसेच या गावांना अंबा नदीतूनच पाणीपुरवठा होतो. या दूषित सांडपाण्यामुळे सुधागड तालुक्यातील अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सचिन तेलंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन माहितीसाठी रायगड जिल्हाधिकारी, नगरपंचायत पाली, ग्रामपंचायत रासळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडेही देण्यात आले आहे.