| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आम्हाला प्रेरणा मिळते, योग्य मार्ग दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे. त्या शिकवणीनुसार मी दिल्ली समोर झुकणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा कानमंत्र दिला.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. दिल्ली येथील तालाकटोरा मैदानात राष्ट्रवादीचे आठवे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे आणि अखंडित राखण्यासोबतच गतीशील विकासाची आज आवश्यकता आहे. काही सांप्रदायिक घटक सातत्याने समाजात जाती आणि धर्माच्या आधारावर विभाजन करू इच्छितात. हा सर्वांसाठी विशेषकरून महिला, अल्पसंख्याक, दलित, आदिवासींसाठी एक फार मोठा धोका आहे. अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
या अधिवेशनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय नवीन भूमिका घेणार, हे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती करण्यात आली, त्याची अधिकृत घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होणार आहे.
निवडून आल्यानंतर आपण राज्यघटना आणि सर्व धर्मांचा सन्मान करू, अशी शपथ घेतो. परंतु काहीजण शपथ घेतल्यानंतर हिंदुत्व, मंदिर किंवा मशीद सारख्या मुद्य्यांवर वादग्रस्त भूमिका घेऊन, अल्पसंख्यांकाच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आजही करतात. त्यामुळे आपल्याला जागृत राहीलं पाहिजे.
– शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष